Sunday, May 26, 2013

साद लडाखची .......


हिमालयाचं आकर्षण प्रत्येक भटक्याला नेहमीच वाटतं असतं , हिमाचल , उत्तरांचल , काश्मिर या लोकप्रिय पर्यटन स्थळांबरोबरच , हिमालयातील ट्रेकिंग रुटसवरती मग भटक्यांची पावलं वळु लागतात. पिंढारी ग्लेशियर किंवा चंद्रखणी पास सारखे ट्रेक मंडळी उत्साहाने करतात. या हिमालयातील भटकंतीचे वर्णन , वाचणाऱ्यांना नेहमीच मोहात पाडणारे असते , पण असे ट्रेक आपल्याला झेपतील का ? हा प्रश्न अनेकांच्या मनात रेंगाळत असतो . या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रत्यक्ष ट्रेकचा अनुभव कसा घेणार ? पण ट्रेकचा नाहीतरी हिमालयातील हाय अल्टीट्यूड प्रवासाचा अनुभव तुम्हाला एका सहलित नक्की घेता येतो . ही सहल आहे लडाखची . आपल्या जम्मू आणि काश्मिर या राज्याचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे या राज्याचे जे तीन विभाग आहेत ते भौगोलिक दृष्ट्या अगदी वेगवेगळे आहेत. जम्मू , काश्मिरचे खोरे आणि लडाखचे शीत वाळवंट या तीन एकमेकांपेक्षा भिन्न भागांनी मिळुन जम्मू आणि काश्मिर हे राज्य बनले आहे. त्यातील लडाख तर केवळ भौगोलिकच नव्हे तर सांस्कृतिक बाबतीत ही भिन्न आहे. लडाखवर बौध्द धर्माचा आणि तिबेटी संस्कृतीचा इतका दाट प्रभाव आहे की लिटील तिबेट किंवा भारतातील तिबेट म्हणुनच लडाख ओळखले जाते. 


लडाखी भाषेत ‘ला ’ या शब्दाचा अर्थ होतो खिंड ( झोजि ला , खार्दुंग ला ) आणि ‘डाख’ म्हणजे अनेक . हिमालय आणि काराकोरम पर्वतरांगाच्या कुशित वसलेल्या या प्रदेशात खुप खिंडी असणे स्वाभाविकच आहे , त्यावरुन नाव पडले ‘ लडाख ’ . या प्रदेशाला शित वाळवंट असे म्हणतात कारण या अतिथंड प्रदेशात पाउस अतिशय कमी पडतो. त्यामुळे इथे दाट जंगल किंवा वनाच्छादित भूप्रदेश पाहायला मिळत नाही. जिकडे पाहावे तिकडे खडबडीत , रुक्ष भासणारे पण रंगांच्या विविध छटांनी नटलेले डोंगर , सुळके आणि टेकड्या दिसतात. काही काही ठिकाणचा भूभाग तर चक्क चंद्र भूमीसारखा दिसतो. हवामान कोरडे असले , पावसाची कमी असली तरी इथेही नद्या आहेत . सुरु , झांस्कर , नुब्रा , श्योक , द्रास , चुशूल या इथल्या नद्यांमध्ये सर्वात महत्वाची आहे ती ‘सिंधू ’ नदी . लहानपणापासुन इतिहास , भूगोलात जिचे नाव वाचलेले असते ती सिंधू नदी या लडाखची जीवनदायीनी आहे .

लडाखच्या खडतर भूमीवर मानवी वस्ती ‘निओलिथिक पिरेड’ मध्ये सुरु झाली. हिरोडोटस , मेगॅस्थिनीस , प्लिनी , टोलेमी या प्राचिन इतिहास कारांच्या लेखनात लडाखमधल्या जमातींचा उल्लेख आढळतो. इसवी सनाच्या पहिल्या शतकात या भूमीवर सत्ता होती ती कुशाणांची . इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात काश्मिरमधुन लडाखच्या पश्चिम भागात बौध्द धर्म आला . तेंव्हा लडखच्या आणि तिबेटच्या परीसरात बॉन धर्म प्रचलित होता. आठव्या शतकात तिबेट आणि चीनमधल्या सत्ता संघर्षात लडाखवर , आलटुन पालटुन दोघांनी ताबा मिळवला . अखेर सन ८४२ मध्ये न्याइमा गॉन याने तिबेटची सत्ता झुगारुन लडाखचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. याच राजवटीत पुन्हा एकदा बौध्द धर्म लडाखमध्ये रुजला. १३ व्या शतकात साउथ एशियात जो मुस्लिमांचा प्रभाव वाढला आणि इस्लामचा प्रसार झाला त्यामुळे लडखमध्येही इस्लाम धर्मियांचे प्रमाण वाढले. १६ व्या शतकात राजा भगन याने लडाखचे एकिकरण केले आणि नामग्याल राजघराण्याची स्थापना केली , या घराण्याचा राजवंश आजपर्यंत अखंड आहे. पुढे मुघलांनी बाल्टीस्थान आणि काश्मिर जिंकले , लडाखचा पराभव केला , पण लडाख स्वतंत्रच राहिला . पुढे सन १८३४ मध्ये जम्मूचा राजा गुलाबसिंग डोग्रा याच्या सेनापतीने जोरावरसिंगने लडाख जिंकला आणि जम्मूच्या राज्याला जोडला . १९४७ साली पाकिस्तानी टोळ्यांनी जी काश्मिरात घुसखोरी केली तेंव्हा भारतीय सैन्याने झोजी ला मधुन प्रवेश करुन पाकिस्तानचा पराभव केला आणि द्रास , कारगिल , लेह मुक्त केले. १९८४ सालापासुन लडाखमधिल सियाचेन ग्लेशियरचा भाग हा भारत – पाक संघर्षाचे केंद्र ठरला आहे. जगातील सर्वात उंचावरील युध्दभूमी म्हणुनच हा भाग ओळखला जातो. रोमांचक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या लडाखचा भुगोलही तितकाच आकर्षक आहे , त्याविषयी पुढिल भागात .  ( क्रमशः ) 
    

No comments:

Post a Comment