Wednesday, May 29, 2013

साद लडाखची ... ( भाग २ )

आपल्या भारताला निसर्गसौंदर्याचे वरदान भरभरुन लाभलेलं आहे . फेसाळत्या सागर किनाऱ्यांपासुन ते हिमाच्छादित पर्वतरांगांपर्यंत आणि घनदाट अरण्यांपासुन ते शुष्क वाळवंटापर्यंत निसर्गाची विविध रुपे आपल्या देशात सहज पाहायला मिळतात. पण या सगळ्यापेक्षा लडाखचे रंग रुप खरोखरच वेगळे आहे. मुळात लडाखची भूमी निर्माण कशी झाली ? तर सुमारे दहा बारा कोटी वर्षांपूर्वी भारतीय द्विपकल्पाचा भाग सरकत सरकत पुढे येउन आशिया खंडाच्या भूभागावर धडकला. या टकरीमुळे तिबेटच्या दक्षिणेला असलेल्या टेथिस महासागराचा तळ उचलला गेला आणि भूपृष्ठाला वळ्या पडुन हिमालय , काराकोरम , हिंदुकुश या पर्वतरांगा निर्माण झाल्या. या भूखंडाची हालचाल अजुनही थांबलेली नाही , त्यामुळे हिमालयात आजही भूकंप , भूस्खलन होताना दिसते. अशा परीसरात लडाख वसलेलं आहे. त्यामुळे हिमालय म्हटल्यावर बर्फाचे मुकुट मिरवणारी उंच उंच पर्वतशिखरे , त्यांच्या उतारावरचे सूचिपर्णी वृक्षांचे दाट अरण्य , त्यातुन झुळु झुळू वाहाणारे झरे असे जे मोहक निसर्ग चित्र डोळ्यांसमोर उभे राहाते तसे लडाखमध्ये काही नाही. २७०० मी. ते ७६५० मी. अशी लडाखची उंची आहे. या सगळ्या भागात सुमारे ५० ते १०० मिलीमीटर इतकाच पाउस पडतो. द्रास , सुरु , झन्स्कार या खोऱ्यांमध्ये जोरदार हिमवृष्टी होते. लडाख समुद्रसपाटीपासुन खूपच उंचावर आहे , त्यामुळे इथे पावसाचे ढग पोहोचतच नाहीत. इथे पडणारा बर्फ वितळून जे पाणि बनते , तोच पाण्याचा मुख्य स्रोत आहे. पावसाच्या अभावामुळेच लडाख शीत वाळवंट बनले आहे. २०१० साली जी ढग फुटी झाली होती तो एक सणसणित अपवाद होता . ग्लोबल वॉर्मिंगमुळे ग्लेशियर्स ( हिमनद्या ) ओहरत आहेत आणि पर्जन्यमान विस्कळीत होते आहे , त्यातुन ती दुर्देवी ढगफुटी घडली असावी. उन्हाळ्यात लडाखचे तापमान ३ ते ३५ अंश सेल्सियस इतके असते तर हिवाळ्यात ते -२० ते – ३५ इतके खाली घसरते. लडाखच्या हवामानाची खासियत म्हणजे उन्हात उभे राहिल्यावर चटके बसतात म्हणुन तुम्ही सावलीत गेलात तर थोड्याच वेळात थंडिने हुडहुडी भरते. 

               
अशा अनोख्या हवामानाच्या परीसरातील जीव सृष्टी तितकीच अनोखी असणे स्वाभाविकच आहे. इथल्या वन्य जीवांचा शास्त्रशुध्द अभ्यास सर्वात प्रथम केला तो १८७० साली फर्डिनंड स्टॉलिक्झका याने. लडाखमध्ये आढळणारे प्राणि पक्षी हे मध्य आशियातील विशेषतः तिबेटच्या पठारावरील प्राणी पक्ष्यांशी मिळते जुळते आहेत. भारताच्या इतर भागातील जंगलांमध्ये जी भुमिका पट्टेरी वाघ बजावतो , तीच भूमिका इथे स्नो लेपर्ड अर्थात हिम बिबळ्या बजावतो. मात्र मुळात लाजरा बुजरा असलेला आणि संख्येने कमी असलेला हा प्राणी फार क्वचित पाहायला मिळतो. साह, शान , त्सोबो या स्थानिक नावांनी हा देखणा प्राणी ओळखला जातो. सध्या लडाखमध्ये अंदाजे २०० स्नो लेपर्ड आहेत. लडाखचे वैशिष्ट्य मानावा असा आणखी एक प्राणी म्हणजे कियांग , कच्छच्या रणात दिसणाऱ्या वाइल्ड ॲस म्हणजे रान गाढवांचा हा हिमालयीन भाइबंद . याला तिबेटी वाइल्ड ॲस किंवा एशियाटीक वाइल्ड ॲस असेही म्हणतात. लडाखच्या डोंगररांगांमध्ये सर्वत्र दिसणारा प्राणी म्हणजे भरल किंवा ब्लू शीप . करड्या निळसर रंगाचा हा केसाळ प्राणी शेळी आणि मेंढीचे मिश्रण वाटतो. या प्रदेशातील बकऱ्यांचा आणखी एक प्रकार म्हणजे एशियन आयबेक्स .भरल खालोखाल हा प्राणी पाहायला मिळतो. हनुवटीवर दाढी असलेल्या आयबेक्सची पिळदार शिंगे लक्ष वेधुन घेतात. लडाखमधिल धोक्यात आलेला प्राणी म्हणजे चिरु अर्थात तिबेटी ॲटिलॉप . या चिरुची लोकर शाहतूत म्हणुन प्रसिध्द आहे , अगदी हलक्या वजनाची आणि लडाखच्या कडाक्याच्या थंडीपासुन रक्षण करणारी म्हणुन शाहतूतच्या शाली जगभर प्रसिध्द आहेत. या लोकरीसाठी हत्या झाल्यानेच चिरु नष्ट होण्याच्या पंथाला लागले आहेत. 

                         

लडाखमध्ये पक्ष्यांच्या सुमारे २५० ते ३०० जाती आढळतात . यात स्थानिक आणि स्थलांतरीत असे दोन्ही प्रकारचे पक्षी येतात. आपल्याकडे ( महाराष्ट्रात ) हिवाळी पाहुणे म्हणुन येणारे ब्राह्मणी डक आणि बार हेडेड गीज हे लडाखचे स्थानिक पक्षी आहेत. दुर्मिळ असलेले ब्लॅक नेक्ड क्रेन्स ही लडाखमध्ये आढळतात. लडाखमध्येच या पक्ष्यांचे प्रजनन होते , हा पक्षी जम्मू काश्मिर राज्याचा स्टेट बर्ड आहे. गोल्डन इगल आणि लॅमरगिअर हे इथले सहज दिसणारे शिकारी पक्षी आहेत. तिबेटियन स्नोकॉक , चुकार , रॅवन , रेड स्टार्ट , हुपो , रॉबिन , गोल्ड फिंच , बंटिंग असे पक्षी येथे पाहायला मिळतात. आगळे वेगळे भूरुप आणि त्यातील अनोखे वन्यजीवन यामुळे लडाखची भेट संस्मरणिय होते.                                    

No comments:

Post a Comment